बुधवार, २८ जुलै, २०१०

पत्र

नाव काय रे तुझं? जेवलास की नाही? आई कुठाय तुझी? काही खाणार का? तिनं प्रश्‍नांची सरबत्ती सुरू केली. त्यानं हूं की चू केलं नाही. बहुतेक खूप रडल्याने त्याचा चेहरा सुजला होता... पण कुठेही मारल्याचे घाव नव्हते... नाकातून बाहेर आलेला शेंबूड त्यानं आत ओढला आणि पुन्हा तो त्या टेलिफोन खांबाला धरून राहिला... त्याची ती शांतता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. सकाळी दहा वाजता ते आठ वर्षांचं पोर त्या खांबाशेजारी बसलेलं होतं. गोबऱ्या गालांचं. गोरंपान आणि अंगात चांगले कपडे असलेलं पोरगं मोठ्या खात्या-पित्या घरातलं वाटत होतं. पहिल्यांदा कोणीतरी असेल म्हणून तिनं त्याकडे साफ दुर्लक्ष केलं... दुपार झाली... ते तिथंच बसून होतं... त्याच्याकडे बघायचं नाही, असं अनेकदा ठरवूनही तिची नजर त्याच्याकडे पुन्हा पुन्हा जात होती... आता त्याच्याकडे बघायचं नाही असं ठरवून ती नजर वळवायची... संध्याकाळ झाली तशी ती अस्वस्थ झाली... त्या पोराची तिला आता दया येऊ लागली, ते चुकलंय की कोणी त्याला इथे आणून सोडलंय, याची विचारपूस करावी म्हणून ती त्याच्याजवळ गेली... तिनं त्याला नाव-गाव विचारलं; पण ते काही बोललं नाही... तिनं त्याला हरतऱ्हेची आमिषे दाखवून बघितली; पण ते बधलं नाही... खांबाचा हात काही त्यानं सोडला नाही... तिला काही सुचेना... त्याला त्याच्या स्थितीवर सोडूनही जाता येईना आणि थांबताही येईना... काही क्षण तिला पोलिसांना फोन करावा वाटला; पण तिला धाडस झालं नाही... पोलिस येणार, त्याला घेवून जाणार... पुन्हा हे तिथंही नाही बोललं तर त्याला बालसुधारगृहात ठेवणार... ती अनेक वर्षे तिथं नोकरीला होती... पोलिसांना फोन म्हणजे त्याच्यासाठी नरकाचा दरवाजा आपल्या हाताने उघडण्यासारखंच... ती आता अस्वस्थ झाली... तिला काहीच सुचेना... त्याला त्याच्या अवस्थेवर सोडून द्यायचं तिनं मनाशी पक्‍कं केलं आणि ती घरात गेली... देवापाशी दिवा लावला... थो
डं कुंकू कपाळाला लावलं... सकाळचं बरंच जेवण शिल्लक होतं... तिनं टीव्हीचा रिमोट हातात घेतला... एक एक चॅनेलवरून ती सरकू लागली... पण मन रमेना... त्या पोराचा विचार मनातून जाता जात नव्हता... खिडकीतून बघावं काय, तो कुठे गेला असा विचार करून ती दोनदा खिडकीपाशी गेलीही. पण तिनं खिडकी उघडली नाही... पण ते जर तिथं असेल तर त्याला अंधाराची भीती नको म्हणून तिनं बाहेरचा दिवा लावला... रात्री बऱ्याच उशिराने तिला झोप आली... पहाटे जाग आल्यावर तिनं पहिल्यांदा खिडकी उघडली आणि त्या खांबाकडे तिनं बघितलं. ते पोरगं तिथं नव्हतं... रात्रीच्या थंडीत ते कुठेतरी गेलं असेल... कुठे गेलं असेल ते... घरी सुखरूप पोचलं असेल का? कोण असतील त्याचे आई-वडील... असे अनेक प्रश्‍नांचे तरंग तिच्या मनात उमटत राहिले. पण तिनं त्याला बगल दिली....ते सुखरुप असेल असा मनाशी समज करून तिनं चहाचं आधण ठेवलं आणि पेपर आला का बघण्यासाठी तिनं दार उघडलं... दारातच ते पोरगं पाय मुडपून झोपलं होतं... अगदी निरागस.. त्याच्या मुठी वळल्या होत्या... त्या वळलेल्या एका मुठीत एक चिठ्ठी होती... तिनं अलगद ती चिठ्ठी सोडवून घेतली...
त्यावर लिहिलं होतं...
प्रिय, संगीता,
याची आई चार वर्षांपूर्वी गेली... कॅन्सरने माझं आयुष्य अवघ्या चार महिन्यांवर आलं आहे... यापुढे याला पाळणारे हजारो मिळतील... पण सांभाळणारं कोणीच नाही... याचा सांभाळ कर...
ज्याच्यासाठी ती आयुष्यभर अविवाहित राहिली होती त्या दिलीपचं ते पत्र होतं...

सोमवार, २६ जुलै, २०१०

नायक

ते पुस्तक बाजुला ठेव आणि ऑर्डर दे... मी माझ्या मित्राला सांगत होतो.. अरे ! हे पुस्तक हातात घेतल्यापासून सोडवतच नाही... आपल्याकडे कुठे होतात असे प्रयोग...सगळे भाषांतरीत किंवा रुपांतरीत....खरी नाटकं होतात... तिकडे युरोपात...
च्यायला तुझं हे असंच असतं.....मरु दे रे तो शेक्‍सपीअर.....
शेक्‍सपीअर कधीच मरणार नाही..... मी मरु दे म्हटल्याक्षणी आमच्या टेबलसमोर येवून ऑर्डसाठी उभा असलेला वेटर म्हणाला....
मला काही सुचलं नाही.... तोही मग काही बोलला नाही.... ऑर्डर घेतली आणि निघून गेला.....नंतर अनेकवेळा त्या हॉटेलमध्ये माझं जाणं-येणं-आणि खाणं होत राहिलं, कधी तो असायचा कधी नसायचा... असला तर ऑर्डर घेण्यावाचून तो काही करायचा नाही.... दोन तीनवेळा मी त्याला बोलतं करण्यासाठी शेक्‍सपीअर, हॅम्लेट असं काही तर बरळत राहिलो पण त्याच्याकडून प्रत्यूत्तर आलं नाही... मात्र मला एक जाणवलं तो असा काही विषय निघाला की त्याला त्याचा प्रचंड त्रास होत असावा, त्यामुळे तो ऑर्डर न घेताच जात असे आणि मग दुसराच कोणी तरी वेटर येवून ऑर्डर घ्यायचा.
एका शनिवारी असाच त्याच हॉटेलसमोरुन जाताना तो बाहेर बसलेला दिसला...
काय रे असा बाहेर का बसलायस.... उगाचच स्वतःच्या इस्त्री केलेल्या कपड्यांचा गर्व होऊन मी त्याला एकेरी हाक मारली.... त्यालाही बहुतेक त्याची सवय झाली असावी त्यामुळे तो काही बोलला नाही.... मग मी त्याच्याजवळ जावून बसलो... काय विशेष!
आज तेवीस एप्रिल.... शेक्‍सपीअर आजच्याच दिवशी गेला....गेला? छे ! तो तर कधी जातच नाही....ठेवून जातो मागे शोकांतिका.... जगण्यातल्या सगळ्या वेदना तशाच ठेवून.....
नंतर तो भेटत राहिला... हॉटेलमध्ये तो काही बोलायचा नाही... पण दर शनिवारी मात्र हॉटेलच्या बाहेरच्या कट्ट्यावर माझी वाट बघत राहायचा... मी भेटलो की मग त्याच्या मनावरची जळमटं थोडी दूर व्हायची... मग बोलत राहायचा इस्किलस, सॉफक्‍लिस, युरिपीडीज, इब्सेन या साऱ्यांविषयी....हॅम्लेट आणि लिअर तर त्याची दैवतंच जणू त्यातील प्रसंगच्या प्रसंग तो म्हणायचा... आख्खा लिअर उभा करायचा...अलीकडे आता त्याला ये-जा बोलावताना जीभ जड व्हायची... पण तोच म्हणाला... आता थोडीही मान वर काढणं मला पेलावणारं नाही... तू मला ये-जाच कर... मीही मग त्याला त्रास दिला नाही....त्याला त्याच्या जागेवर सोडून दिलं... त्यातूनही एकदा त्याला मी विचारलं.... तू इथे म्हणजे हॉटेलमध्ये कसा म्हणून, पण तो बोलला नाही...... त्याचे ते निस्तेज डोळे केवळ हलले.... आणि तो उठला....
माझा प्रश्‍न आवडला नसेल, तर राहू दे पण बोलायचं टाळू नको... मी म्हटलं.
तो काही बोलला नाही... पण त्या प्रश्‍नाचा त्याच्यावर फारसा फरकही झाल्याचे जाणवला नाही. त्यानंतरही तो अनेकवेळा अनेक विषयांवर बोलत राहायचा....
एकदा असाच तो बसलेला असताना त्याच्या हातात काहीतरी होतं....मी खोदून खोदून विचारल्यावर त्यानं तो फोटो दाखविला....
लग्नानंतर पाचच दिवसात सहकारी प्रोफसरबरोबरच पळून गेली..... एवढंच म्हणाला
मला काय समजायचं ते समजलं... मी गप्प बसलो त्याला पुढचं काही विचारलं नाही.... एखाद्या शनिवारी मी भेटलो नाही की अस्वस्थ व्हायचा.... पण काही बोलायचा नाही.... तू येत जारे एवढंच म्हणायचा... एकदा मी म्हटलं अरे तुला जर माझी आठवण आली की एखादा फोन करत जा ना.... तो म्हणाला नको रे तुम्ही कामात असता तुम्हाला त्रास द्यायला आवडत नाही.... मी काही समजावून सांगितलं तरी तो ऐकणार नव्हताच.... मग बळेच मी त्याच्या खिशात माझे कार्ड कोंबले....
यावर माझा मोबाईल नंबर आहे.... तुला फोन करावा वाटला की कर .....मी काही फार बिझी असत नाही....
तो काही बोलला नाही.... पण त्याने ते कार्ड फेकूनही दिलं नाही..... नंतर अनेक आठवडे त्या हॉटेलात मला जाता आले नाही.....
एक दिवस रात्री उपसंपादकगीरीचे काम करत असताना पोलिस ठाण्यातून फोन आला.....ओळख पटवायची होती... मी गेलो तो तोच होता....
डोक्‍यात जोराचा मार बसल्याने गेला, बहुतेक कुणीतरी बेदम चोपलेले दिसते.... पोलिसाने बातमीच्या अंगाने माहिती पुरविली...मी काही बोललो नाही... सरळ हॉटेलमध्ये गेलो...ं
मॅनेजरला विचारलं, "" काय झालं, त्याला कोणी मारलं.''
काही नाही ओ.. चांगला... चांगला म्हणता म्हणता नालायक निघाला साला, आहो हॉटेलमध्ये आलेल्या बाईचा हात धरला..... लोकांनी बेदम मारलं मी तरी काय करणार... लोक हॉटेलात यायचे बंद व्हायचे..... मारलं ते बरंच झालं.....
मला त्याचं पुढचं बोलणं ऐकूच आलं नाही.... जाता जाता त्या हॉटेलमालकाला विचारलं तो काही बोलला का?
त्या बाईला शीला म्हणत होता.....आहो एका प्रोफेसरची बायको ती ....
मला काहीच सूचलं नाही.... ज्या नायकांच्या प्रेमात तो होता... त्यांच्याच पंक्‍तीत तो केव्हाच जावून बसला होता....आणखी एक शोकांतिका बस्स!

सोमवार, १२ जुलै, २०१०

मोगरा!

प्रवेशाच्या रांगेत शेवटच्या क्रमांकावर तो होता. येता-जाता शिक्षक त्याच्याजवळ थांबत त्याची विचारपूस करत. बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्षात तो वर्गात पहिला आला होता. भौतिक शास्त्रासारख्या विषयात तर त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. त्याच्याकडून महाविद्यालयाला खूपच अपेक्षा होत्या. त्याने विद्यापीठात प्रथम यावे अशी सगळ्या प्राध्यापकांची इच्छा होती. तो मात्र शांत होता. अगदी बुद्धासारखा. कोणी त्याला "जिनीअस,' तर कोणी "न्यूटन' म्हणून हाक मारत; पण त्याच्या चेहऱ्यावरची स्मिताची लकेर कधी बदलली नाही. शिक्षक त्याच्याजवळ येऊन थांबत. त्याची विचारपूस करत. त्याच्या खांद्यावर हात ठेवत आणि पुढे जात.
प्रवेशाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सगळेच गडबडीत होते. कार्यालयातील कर्मचारी आपल्या नेहमीच्या शैलीत समोरच्या विद्यार्थ्यांवर खेकसत होता. प्रत्येक अर्जातील चुका त्याला पृथ्वीगोलाएवढ्या दिसत आणि हर्क्‍युलससारखा त्याचा भार आपल्या खांद्यावर पडल्यासारखा त्याचा चेहरा होई.
"शेवटच्या दिवशीच तुम्हाला कशी जाग येते,' असा प्रश्‍न जवळपास प्रत्येकाला विचारत एक-एक अर्ज हातावेगळा करत होता. रांग कूर्मगतीने पुढे सरकत होती. रांगेत आता त्याच्या मागेही मुले आली होती. शनिवार असल्याने कार्यालय दुपारीच बंद होणार, हे निश्‍चित होते. त्यामुळे रांगेत चुळबूळ सुरू झाली. सोमवारी जादा शुल्क भरून अर्ज स्वीकारले जाणार होते. त्यामुळे मधल्या एक-दोन मुलांनी सोमवारचा पर्याय खुला करत काढता पाय घेतला.
बाराचे ठोके वाजले, तसे अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले. तासाभरात अर्ज भरला नाही, तर सोमवारी उगाच दोन-अडीचशे रुपयांना फटका बसणार होता. त्यातच ज्यांना दुसऱ्या वर्षाला कमी गुण होते त्यांना "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश' या अटीमुळे आवडीचा विषय मिळतो की नाही, याचीही धाकधूक होतीच. त्यामुळेच रांगेत चुळबूळ वाढली. तो मात्र शांत होता. मघाशी त्याच्याशी बोलून पुढे गेलेल्या प्राध्यापकांपैकी एक जण त्याच्याकडेच येत होते. त्याच्यापाशी आले, त्याच्याकडे बघून त्यांनी स्मित केले आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या विद्यार्थ्याकडे बघत म्हणाले, ""इथं काय करतोय? रांगेतून आज तुला प्रवेश मिळणार नाही. चल.'' तो मुलगा त्यांच्या पाठीमागून गेला. जाताना त्याने आपल्या बरोबरच्या मुलांनाही नेले. तो मात्र शांत होता. बरोबर एक वाजता त्याचा क्रमांक आला. त्याने आपला अर्ज त्या कारकुनाच्या हातात दिला आणि घड्याळाने एकाचा टोला दिला. कारकुनाने एकदा त्याच्याकडे बघितले आणि दुसऱ्याच मिनिटात पावती हातात दिली. ""सरांना सांगितलं असतंस, तर लगेच काम झालं असतं. रांगेत उभं राहण्याची गरज नव्हती,'' तो भाबडेपणाने म्हणाला. त्याचे वडील त्याच कॉलेजमध्ये उपप्राचार्य होते.
""मोगऱ्याच्या वेलीला वाढण्यासाठी आधाराची गरज असते, फुलण्यासाठी नाही. त्यामुळे चालताना कुबड्या घेतल्या तेवढ्याच पुरेशा आहेत. आता आणखी कशाचाही कुबड्या नकोत मला,'' बाजूला ठेवलेली कुबडी उचलत तो शांतपणे म्हणाला आणि निघून गेला.
खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली. का कोणास ठाऊक; पण कारकुनाला त्यातून मोगऱ्याचा गंध जाणवला.

बुधवार, ३० जून, २०१०

पाण्याचा थेंब

सकाळपासून पावसाची रिपरिप थांबली नव्हती. तिच्या अंगावरची खोळ केव्हाच भिजून ती आता गळू लागली होती. डोक्‍यापासून ती चिंब भिजली होती... तशातच तिनं घराला जवळ केलं. अंगावरची ओली साडी तशीच ठेवून ती गोठ्यात शिरली आणि धारा काढायला सुरवात केली. आज डेअरीला दूध घातले नाही तर उद्याची मीठभाकर मिळणार नाही याची तिला जाणीव होती. तिने पटापट धारा आटोपल्या. डेअरीला दूध घातलं आणि तशीच ती घरी परतली. अंगावरची साडी आता सुकायला लागली होती. चुलीच्या धगीत ती आणखी सुकेल म्हणून तिनं निखाऱ्यावर फुंकर मारली आणि शेणी आत सारली. आगीने पेट घेतल्यावर तिनं साडीचा पदर जरा त्यावर सुकवायचा प्रयत्न केला आणि मिश्रीचं बोट तोंडात कोंबलं. तिचं दहा वर्षांचं पोर शाळेतनं पळत घरात आलं. चिखलाने माखलेल्या कपड्यांसहच ते तिला जाऊन बिलगलं. तिनं त्याला तसंच बाजूला सारलं. ते थोडं हिरमुसलं; पण लगेच बाहेर खेळायला पळालं. तिनं चुलीवर चहाचं आदण ठेवलं आणि परत त्याला तिनं हाक मारली. ते मघाच्याच वेगानं परत आत आलं, कपातला चहा त्यानं बशीत घालून भुरकायला सुरवात केली. चहा भुरकून झाल्यावर त्याला काही तरी आठवलं, मग म्हणालं, ""आये, यंदा चंद्री याली तरी च्या काळाच की.'' ती काही बोलली नाही. तसलाच काळा चहा तीही प्यायली आणि मालकिणीच्या घरी भांड्याला गेली. भांडी घासता घासता मालकीण मोठ्यानं ओरडताना तिनं ऐकलं. काय झालं म्हणून ती आत आली तर तिच्या पोराएवढंच मालकिणीचं पोरगं व्हॉं करून रडत होतं आणि त्याची आई त्याला जबरदस्तीनं दूध पाजत होती. निम्मे दूध खाली सांडत होतं. ते नको नको म्हणत होतं, पाय आपटत होतं. ती तशीच घरी आली. दारात तिचं पोर खेळत होतं. तिला त्याला जाऊन मिठी मारावी वाटली; पण धीर झाला नाही. तिच्या डोळ्यातून एकच थेंब आला; पण त्याचा प्रवाह दिवसभर पाऊस पडून भरलेल्या नाल्यापेक्षा जास्त होता.

बुधवार, २८ एप्रिल, २०१०

नाणी..

आई-वडील नाहीत, भूक लागलीय रुपाया द्या की! अकरा-बारा वर्षांचं ते पोर काकुळतीला येऊन मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्यांकडे हात पसरत होतं. कोणी हातावर त्याच्या एखाद्‌ दुसरं नाणं टेकवत, तर कोणी तसंच निघून जाई. हळूहळू मंदिरातील गर्दी कमी होऊ लागली... त्याच्या शर्टच्या खिशातही नाणी खूप जमा झाली... त्यानं सगळी नाणी काढली, ती मोजली आणि पुन्हा खिशात कोंबली... आणखी चार रुपयांची त्याला गरज होती म्हणून ते पुन्हा मंदिराच्या दारात आलं. येणाऱ्यांपुढे हात पसरत राहिलं. मंदिराच्या दिशेनं येणाऱ्या सुटा-बुटातील माणसांकडे त्यानं पाहिलं. आता यानं पाच रुपयांचं नाणं दिलं की, संपलं म्हणून त्यानं त्याच्याकडे हात पसरला आणि पुन्हा आई-वडील नसल्याचं पालुपद सुरू केलं... त्या साहेबानं त्याच्याकडे एकदा बघितलं, तुच्छतेनं मान फिरविली आणि तो चालू लागला. त्याच्या मागून येणाऱ्यानं पोरांकडं बघितलं आणि त्याला त्याचा संताप आला. त्यानं पोराला धरलं आणि दोन मुस्काटात मारल्या... आई मेली काय, म्हणत तो त्याला मारू लागला. साहेबाला आता त्या पोराची दया आली. त्यानं मागं वळून त्या माणसाच्या हातातून त्याची सुटका केली. पैसे द्यायचे नसतील तर नका देऊ, पण मारू नका... साहोबानं सुनावलं.... त्या माणसानं साहेबांकडे बघितलं आणि रागानं पुन्हा पोराच्या मुस्काटात मारली, "ह्यो माझा भाचा हाय आणि त्येची आई जित्ती हाय.... असं काही काही सांगत राहिला. साहेबाला काही कळलं नाही. त्यानं तरीही त्या पोराचा हात त्या माणसाच्या हातातून सोडवला. बॅगेतील पाण्याची बाटली बाहेर काढली आणि त्या पोराला पाणी पाजलं. "तुझी आई जिवंत आहे ना?' साहेबानं प्रश्‍न विचारला. "हो!' पोरानं डाव्या मनगटानं शेंबूड पुसला आणि रल्या ओढातून ते पुटपुटलं. त्याला शांत होऊ दिलं आणि मग साहेबांनं विचारलं, "मग भीक का मागतोस? आईनं सांगितलं का?' त्याला आता धीर आला. "आईनं नाही
सांगितलं, पण...' त्यानं खिशातून ती सगळी नाणी बाहेर काढली. ती पुन्हा मोजली "यात आणखी दोन रुपये घालून परीक्षेची फी भरणार आहे... उद्या लगेचच भरायची आहे. हॉटेलात काम मागायला गेलो त्यांनी दिवसाला 20 रुपयेच देणार म्हणून सांगितलम्हणून इथं आलो.' फीसाठी पैसे पाहिजेत म्हटल्यावर कोणी पैसे द्यायला तयार नव्हते. म्हणून आई-वडिल मेले म्हणून पैसे मागायला लागलो. साहेबाला काही कळलं नाही. साहेबाचा हात नकळत खिशात गेला. त्याला तिथं नाणी लागली, पण ती त्याला द्यावी वाटली नाहीत. खिशाचं पेन त्यानं काढलं आणि त्याच्या हातात टेकवलं आणि... साहेब मंदिरात न जाताच निघून गेला.

गुरुवार, १ एप्रिल, २०१०

एप्रिल फुल !

रात्रीचे बाराचे ठोके पडले आणि तिचा मोबाईल वाजला...डोळे तारवटतच तिने तो उचलला आणि हॅलो म्हटलं.....हॅलो मी दारात उभा आहे.. दार उघड... त्याचा आवाज ऐकून ती थोडी बावचळली.....एवढ्या रात्री का आला असेल? काहीतरी नक्‍की महत्त्वाचं काम असेल म्हणून तिने दार उघडलं... दारात कोणी नाही बघून तिनं दार बंद केलं आणि त्याला फोन लावला... तो मोठ्याने ओरडलाच...एप्रिल फुल. ती स्वतःशीच हसली. फोन ठेवला आणि आडवी झाली. तिने झोपायचा प्रयत्न केला, पण झोप येईना. मागचे दिवस आठवत राहिले. तो पहिल्यांदा भेटलेला... कॉलेजमध्ये त्याने केलेली धमाल... नंतर त्याने केलेलं प्रपोज. त्याच्याशी आपण लग्न करणार आहे म्हटल्यावर आईने केलेला थयथयाट...
किती दिवस तो आईला समजावत होता. त्यासाठी रोज तिच्या शाळेत जात होता. आईच म्हणाली नंतर, जर त्यानं मला प्रपोज केलं असतं तर मीही हो म्हटलं असतं. खूप बडबड्या. लग्नानंतर किती काळजी घेत होता. एकेकदा त्याच्या त्या काळजीचाही वीट यायचा. आपण त्याला म्हणायचो की नको काळजी करत जाऊ एवढी. पण तो साधं डोकं दुखत असलं तरी रात्र रात्र बसून राहायचा. एकदा असंच ऑफीसच्या ट्रीपला गेल्यावर याचे एवढे फोन आले की शेवटी त्याला बास असं सांगावं लागलं. त्यानं तरी ऐकलं नाही. फोन वाजत राहिला. बॉस म्हणालाच असले अँटीने बदलावे. त्यावेळी काही वाटले नाही. पण नंतर तसं साचत राहिलं.
बॉसच्या शेजारी असताना याचा फोन आला की बॉसचं डोकं फिरायचं. मग तो कामात न झालेल्या चुकाही दाखवत राहायचा. त्याचा त्रास होऊ लागला. त्याची अति काळजी आता अंगावर येवू लागली. चिड येवू लागली. मग, एकदा त्याला सरळ सांगून टाकलं, आपलं यापुढे एकत्र राहाणं शक्‍य नाही. तो काही बोलला नाही. नंतर त्या आवेगातच आपण घटस्फोटाची कागदपत्रे केली. त्यानं का हा प्रश्‍न न विचारताच सही केली.
मग फोन बंद झाले. पहिले काही महिने छान गेले. बॉस नेहमीप्रमाणे बोलत होता. मग अचानक एक दिवस बॉसने छेडले... मैत्रीणीजवळ आपण खूप रडलो. पण दुसऱ्याच दिवशी बॉसने केबीनमध्ये बोलवून पाय धरले. बॉसचा सुजलेला चेहराच सांगत होता की त्याने रात्री त्याला बदड बदड बदडले असणार. त्याला फोन केला. तोच उत्साह खूप बडबडला. मग फोन खाली ठेवला. त्या रात्री खूप एकटं वाटलं. मग नंतर तो फोन करत राहायचा. आधी विचारायचा की तू रिकामी आहेस का? मग बोलू का विचारायचा आणि बोलायचा. त्याचा तो त्रयस्थपणा अंगावर यायचा. पण धीर नाही झाला. मग एक दिवस त्याला सरळ विचारलं आपण पुन्हा लग्न करुया का? लगेच हसला. मग म्हणाला, नको... आपल्या लग्नाची तारीख एक एप्रिल होती. एकदा "फुल' बनल्यावर तीच चूक पुन्हा कशाला !

रविवार, १४ मार्च, २०१०

याद तुझी......

आम्ही थोर पत्रकार नाही आहोत. पोटासाठी काम करावे, पोट भरुन उरले तर दिमागाला खाद्य पुरवावे, अगदीच अपचन झाले असेल आणि वैद्याने लंघनाचा सल्ला दिला असेल तर थोडे होन आणि काही नाणी शिल्लक राहिली समजून एखादा चित्रपट बघण्याची हौस आम्ही पुरवत आलो आहोत. वर उल्लेखल्याप्रमाणे आम्ही लेखणीशी निगडीत धंदा करत असल्याने आम्हास अनेक ठिकाणी प्रतिष्ठा मिळते, तसे काही ठिकाणी आम्हास श्‍वानकुलीन समजून हाड हाडही केले जाते. पण आम्ही अशांकडे दुर्लक्ष करतो आणि लेखणी पाजरतोच. खरे तर नाटक आणि सिनेमांना आम्ही आमचा गनीमच मानला आहे. दिसला की घातली वाघनखे, काढला कोथळा बाहेर... पण आलिकडे असे काहीतरी वेगळे होऊ लागले आहे की ती चित्रपटातील सगळी मुर्खपणाची गाणी, आणि नट नट्यांचे धावणे, पळणे आवडू लागले आहे..... अगा विपरीत झाले म्हणून आम्ही हे आमच्या तिर्थरुपांना सांगितले, त्यांनी नेहमीप्रमाणे पहाडी हास्याचा आवाज करीत कोण आहे रे ती असा सरळ प्रश्‍न आम्हांस पुसला. तिर्थरुपांना सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे आवडत नाहीत हे एव्हाना आमच्या ध्यानात आले असल्याने आम्ही सरळ मातोश्रींच्या पायात झुकलो. मातोश्रींनीही आम्हाला तोच प्रश्‍न पुसल्याने एकंदरीतच आमचे काही खरे नाही हे आम्हाला कळून चुकले. सांप्रतसमयी आमचे मन एका कन्येवर जडल्याचे तुम्हाला कळले असेलच पण तो विषय नाही. आमचे मन कुठेतरी लागल्याचे आम्हास खूप महिन्यांपासून ज्ञात आहे, पण अलिकडच्या काळात आम्ही मुर्खपेटीच्यासमोर बसून तासनतास ते प्रेमकाव्याने ओथंबलेले चित्रपट बघतो आहोत, प्रियतमेच्या विरहात डावा हात तोंडावर घेत, पिंजारलेल्या केंसावरुन हात फिरविणाऱ्या तरुणसदृश प्रौढाचे काळ्या पांढऱ्या रंगातील चित्रपट बघतो आहोत. आम्ही कोण कुळातील, आमचा काय हुद्दा याचे स्मरण न ठेवता आम्ही आता शिळही फुंकतो आहोत.. कोण अधर्म हा म्हणून आमुचे स
गे सोयरे आमच्याकडे बघत आहेत किंतू त्यांसी दुखवावे हा हेतू आमुच्या मनी कधी शिवला नाही, तत्कारणी आम्ही गप्प बसतो. सांप्रत समयी थ्री इडीयटनामक चित्रपटात महान तत्ववेत्ते जे की आमीर खान यांनी समस्त तरुणांना धडा शिकविता शिकविता त्यातील कन्येला सांगितले तैसेच आमुच्या बाबतीतच होत आहे. आता याला जर कोणी नावे ठेवत असेल तर ठेवो बुवा......

सोमवार, १ मार्च, २०१०

जुगार तुम्ही जिंकलात

प्रिय डॉ. सलील यांना,
स. न. वि. वि.
परवा शनिवारी कोल्हापुरात तुमचा गाणी मनातील हा कार्यक्रम झाला. कार्यक्रम सुंदर होता, आवडला या प्रतिक्रीया तर खूप लोकांकडून तुम्हाला आल्याच असतील, त्या पुन्हा इथे देण्यात आणि तुमचा वेळ घेण्यात अर्थ नाही. खरे तर सोन्याला सोने किंवा हिऱ्याला हिरा म्हणणे म्हणजे वेळ वाया घालविणे आहे. त्यामुळे तुमचा कार्यक्रम आणि तो चांगला झाला या गोष्टी एका सुत्राच्या बरोबर चिन्हाच्या आल्याड पल्याडच्या दोन बाजू आहेत. पण पत्र हे सांगण्यासाठी लिहिलंच नाही.
पत्र लिहिण्यामागे खरं कारण खूप दिवसांनी एखाद्या संगीतकाराने आपली पहिली निर्मिती रंगमंचावर सादर केली. अलिकडे माध्यमांच्या प्रसारामुळे गाणी गाजतात, लोकांच्या ओठावरही येतात पण ती कानावर अनेकवेळा आदळल्याने, गाण्यात फार दम आहे म्हणून नाही. त्यामुळे एकदा का हा पूर ओसरला की मग मागे उरतो तो केवळ कचराच. अशात तुमची गाणी खूप गाजली आणि ओठावर नुसती आलीच नाहीत तर ती रेंगाळलीही आणि मनात घर करुन राहिली. त्याच त्या कार्यक्रमांना खूप प्रसिध्दी आणि पैसा मिळत असतानाही तुम्ही "गाणी मनातली' हा कार्यक्रम घेवून आलात. खरे तर डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे हे ब्रॅंडींग इतके मोठे आहे की पुण्यात तुमचा सोलो कार्यक्रम झाला असता तरी लोकांनी तोबा गर्दी केली असती. पण तरीही कोल्हापुरात कार्यक्रम घेण्याचा जुगार तुम्ही खेळलात. पहिल्यांदाज डाव मांडावा आणि तिन्ही एक्‍के हाती लागावे तसा तो जुगार तुम्ही जिंकलातही. रंगमंचाखालून तुमच्या उत्स्फूर्ततेला आणि आत्मविश्‍वासाला सलामही ठोकला गेला. खरे तर तुमच्या समकालीन संगीतकारांत तुम्ही ठसा उमटविला आहे. आमच्या जन्माअगोदरची गाणी गातच आम्ही मोठे झालो... मधल्या काळात खूपच सुमार दर्जाचे संगीत महाराष्ट्राला ऐकायला मिळाले. सौमित्रची गीते आणि मिलींद इंगळे यांचा आवाज घेवून आलेल्या गारव्याने कोरड्या घशात ओलावा निर्माण केला खरा पण तोही कट पेस्ट असाच होता, कारण त्यापुर्वी हिंदीत त्याच संगीताने यश मिळविले होते मग त्याच बोलांवर मराठी शब्द पेरले गेले. सौमित्र यांच्या शब्दांनी मात्र तरीही जादू केलीच. पण संदीप खरे आणि सलील कुलकर्णी या जोडीने मराठी भावगीतांना पुन्हा सोनेरी दिवस आणले. हे सगळं लिहिण्यामाने केवळ तुमची स्तुती करावी हा हेतू नाही, स्तूती करायची असेल तर आता पायलीला पन्नास भाट मिळतात, आणि अशी तुणतुणी मला वाजवता येतच नाही. पण कोल्हापुरात तुम्ही केलेल्या नव्या प्रयोगाबद्दल तुमचे अभिनंदन आणि मला खात्री आहे की तुम्ही यापुढेही आमचा विश्‍वास ढळू देणार नाही.

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

शेकडो समुद्रांचा ओलावा

बास झालं! उठा आता... हा रस्ता पुरा करायचाय... भाकरीचा शेवटचा घास तोंडात जायच्याआधीच मुकादमाची हाक ऐकून ती थोडी वैतागलीच... हातातला घास तसाच तोंडात कोंबत तिने घटाघटा पाणी प्यायलं.... डोक्‍यावर बांधलेला टॉवेल सावरत तिनं मांडीवरल्या लेकराला झाडाला बांधलेल्या झोळीत टाकलं... तिच्या हिसक्‍याच्या उठण्यानं ते जागं झालं आणि त्या झोळीत उठून बसलं...मुकादमाचा तोंडाचा पट्‌टा सुरुच होता... एकेकीचं नाव घेत कामाला लागायच्या तो सुचना देत होता.... हीचं नाव घेऊन तो ओरडलाच... बाई पोराला घरात ठेवा, इथं कामं असतात.... असं काहीबाही तो बडबडत राहिला.... ती उठली...तिच्या बरोबरच्या बाया मुकादमाला शिव्या देतच उठल्या... काळ मागे लागल्यासारखाच मेला पाठिवर बसतो.... त्या पुटपुटल्या.... पण हे काम सुटलं तर लवकर काम हाताला मिळायचं नाही...त्यामुळे त्या त्याच्या मागनं चालू लागल्या. तीही उठली... हातात झाडू घेवून रस्ता साफ करु लागली.... हात हालवा बाई.... सगळी धूळ गेली पाहिजे.... डांबर चिकटत नाही त्याशिवाय... मुकादम अशा सुचना देतच होता. एवढ्यात तिला तिच्या तान्हुल्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. पहिल्यांदा तिने त्याकडे दुर्लक्षच केले, पण ते कळवळायला लागल्यावर ती उठली... आईचा स्पर्श झाल्यावर तेही रडायचं थांबलं... तिच्याकडे बघून खुदकन हसलंही.... वादी हाय जन्माचा! म्हणत तिनं त्याला झोळीतून उचललं... पटपटा त्याचे मुके घेतले.... मग त्याला पुन्हा झोळीत ठेवलं... आई लांब गेली तशी ते पुन्हा रडायला लागलं... ती मागे वळली... त्याला कडेवर घेतलं आणि काम चालू आहे तिथं त्याला आणलं... वर सूर्य आग ओतत होता...तापलेला रस्ता उष्ण उच्छ्शास सोडत होता....तिनं डोक्‍याचा टॉवेल सोडला त्या तापलेल्या रस्त्यावरच तो पसरला... तान्हुल्या गालाचा पापा घेत त्याला त्यावर ठेवलं....आणि पुन्हा हातात झाडणी घेतली.... तापलेल्या उन्हात ते तान्हुलं तिथंच खेळतं राहिलं...
. त्याला आईच्या डोळ्यांतील शेकडो समुद्र ओलावा देत होते....

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०

पंड्या

पुर्वी गावाकडे आमच्या घरी अनेक माणसं यायची.... गोंधळी, रामदासी अशी बरीच माणसं त्यात असायची... आजीने तर अनेक विधवा, परितक्‍त्या बायांना आमच्या वाड्याच्या समोरच्या खोलीत राहायची मुभा दिली होती. घरातील नीटवाट, पाणी भरण्याची कामं या बाया करायच्या आणि मग आजीच त्यांना लागेल तो शिधा द्यायची.... खूप वर्षे हे असंच चालू होतं. यामध्येच एक यायचा म्हणजे काशिचा पंड्या. साठी पार केलेला... डोक्‍याचा गोटा, कळकट मळकट धोतर आणि तशीच कळकट पिशवी खांद्याला अडकवलेला पंड्या दरवर्षी हिवाळ्यात आमच्या घरी यायचा. हा काशिहून यायचा म्हणे ...आणि तेथील गंगाजल आणि काळा दोरा आम्हाला द्यायचा. खरे तर तो काशिचा पंडित पण का कोणास ठावूक आमच्या घरातील सगळ्या बाया-बापड्या त्याला पंड्याच म्हणायच्या. विशेष म्हणजे तो आला हे कळल्यावर आमच्या आत्याही खास त्याच्याकडून काशिचा गंडा बांधायला माहेरला यायच्या. तो महाराष्ट्रातील बऱ्याच देशस्थांच्या घरी जायचा, आमच्या अनेक पाहुण्यांकडे तो कधी ना कधी गेलेला असायचाच... कुणाकडे उन्हाळ्यात... कुणाकडे पावसाळ्यात...सगळीकडे तो त्याच्या त्या कळकट मळकट पिशवीतून काळ्यामीट्‌ट बाटलीतील गंगाजल पाजायचा. माझे वडील नेहमी म्हणायचे हा कुठला जातोय काशिला, इथेच पंचगंगेचं पाणी बाटतील भरत असेल आणि आंबाबाईच्या देवळातील दोरे वाटत असेल.... पण असं असलं तरी तेही त्याच्याकडून भक्‍तीभावानं पाणी घ्यायचे आचमन करुन डोक्‍याला हात पुसायचे....आणि वर्षभर तो काळा गंडा हातात जपायचे... असा हा पंड्या कमरेत वाकलेला, अनुनासिक हिंदी बोलणारा, कर्मठ दरवर्षी हिवाळ्यात आमच्या घरी मुक्‍कामला यायचा. एकदा आला की किमान पंधरा दिवस त्याचा मुक्‍काम हालयाचा नाही.
खरे तर पंड्याचा आम्हाला फार राग यायचं कारण काहीच नव्हतं....पण त्याच्याकडून काळा गंडा बांधून घेणं म्हणजे एक दिव्यच असायचं. काळा दोरा बांधला की
त्याला नमस्कार करायला लागायचा....नमस्कार केला की तो दोन्ही हातांनी जोराचा धपाटा पाठीवर मारायचा.. त्याने पाठित सणकच भरायची... त्यामुळे पंड्याचा आम्हाला प्रचंड राग यायचा......तर त्याला बायकांची शिवाशिव चालयची नाही याचा घरातील बायकांना त्रास. शीव... शीव...शीव असा कायमचा जप त्याच्या तोंडात असायचा...त्याच्यासाठी सडलेले तांदूळ, स्टोव्ह, तांब्याच्या घागरीत पाणी याची तजवीज करायला लागायची...तो स्वयंपाक करत असला की त्याच्याशेजारी कोणी गेल्याचे त्याला आवडायचे नाही. खासकरुन बायकांनी. त्याने म्हणे स्वतःच केलेल्या स्वयंपाकाशिवाय दुसरा घास तोंडात टाकला नव्हता.. कधी मधी आई स्वयंपाक घरात गेलीच तर
लगेच म्हणायचा
दूर... दूर...दूर.. भाभींजी आप थोडा अलग रहें.... आईला याचा प्रचंड राग यायचा
मेल्याने माझ्याच घरातील स्वयंपाकघरावर आपला हक्‍क सांगितलाय.. आई पुटपुटायची.... तो पंड्या लगेच माझ्या आजीकडे आईची तक्रार करायचा. मग आजी म्हणायची, ""त्याला नका रे त्रास देवू काशिचा ब्राह्मण आहे.... ब्रह्मचारी आहे.... शाप देईल...... दरवर्षी तो यायचा नंतर नंतर तो थकत चालला होता..... पण पीळ मात्र तसाच... शीव..शीव..शीव..चा जप कायम....आता तर आजीही नव्हती जिच्याकडे तक्रार करायला.... एकदा आई अशीच चिडली... म्हणाली, दक्षिणा घ्या आणि चालते व्हा... तुमची नाटकं इथं कोणी सहन करणार नाही... मग तो आमच्या शेजाऱ्यांच्या घरी गेला.... तिथून पुढे कुठे गेला ते कळलेच नाही.... नंतर बरेच वर्षे पंड्या आला नाही... आम्हालाही त्याची आठवण आली नाही.... नंतर एकदा माझ्या मावशीनं सांगितलं.... तो तिच्या गावात राहायचा एकटाच... नंतर नंतर त्याला स्वयंपाक करायला जमायचं नाही... पण त्याने हेका सोडला नाही.... मग एकदिवस त्याने स्वतःला रेल्वेखाली झोकून दिलं..... पोलिस रिपोर्टमध्ये आलं 80 वर्षांचा माणूस... आत्महत्या.... सोबत पिशवी, त्यात एक पाण्याची बाटली आणि काही काळे दोरे....